पाकिस्ता-नचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदतीसाठी साकडे घातले. ‘आयएमएफ’ने मात्र आर्थिकद़ृष्ट्या जर्जर झालेल्या पाकला यापुढे आणखी मदत देण्यास स्पष्ट नकार दर्शविला. पाकिस्तानने कर्जाची मागणी करण्यापेक्षा कराद्वारे स्वतःचा महसूल वाढवावा, अशी सूचनाही ‘आयएमएफ’ने खान यांना दिली. पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिका आणि ‘आयएमएफ’ने पाकची आर्थिक नाकेबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर खान अमेरिका दौर्यावर गेले आहेत. या दौर्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेऊन अर्थसहाय्य देण्याची मागणी करणार आहेत. ‘आयएमएफ’चे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड लिपटॉन यांचीही भेट घेऊन कर्जाची मागणी केली आहे. अलीकडेच पाकला ‘आयएमएफ’ने 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. त्यामुळे खान यांनी पुन्हा कर्जाची मागणी केल्यामुळे लिपटॉन यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. पाकने कराद्वारे महसूल वाढवून विकासाची कामे मार्गी लावावीत. यापुढे ‘आयएमएफ’कडे निधीसाठी आणखी साकडे घालू नये, अशा स्पष्ट शब्दांत खान यांचा ‘आयएमएफ’ने पाणउतारा केला.