महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा भाजपाला अल्टिमेटम दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राणेंनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. भाजपासोबत राहणार की नाही याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. अमित शाहांनी पक्ष प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. आता देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचंही राणेंनी म्हटलं आहे. येणाऱ्या 10 दिवसांत सर्व निर्णय घेईन, 10 दिवसांनंतर मी भाजपात जाणार की स्वतःच्या पक्ष चालवायचा हे ठरवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. भाजपानं दिलेली आश्वासनं 10 दिवसांत पूर्ण होतील, अशी आशा आहे. निर्णय घ्यायचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही सूचक विधान राणेंनी केलं आहे.
