अंगणवाडी कर्मचार्‍यांचे असहकार आंदोलन मागे

0

कुडाळ : वाढलेले घरभाडे, अंगणवाडी सेविकांना अतिरीक्‍त दरमहा पाचशे रूपये व मदतनीसना अडिचशे रूपये भत्‍ता, फर्निचरसाठी पैसे आणि मानधनाची निम्मी रक्‍कम दरमहा पेन्शन म्हणून द्यावी या मागण्यांसदर्भात लवकरच कृती समितीची बैठकी बोलावून निर्णय घेण्यात येणार असल्याचे महिला, बाल व ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मंगळवारी पासून अंगणवाडी कर्मचार्‍यांचे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून आता अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आपले नियमित काम सुरू करावे, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलताई परूळेकर यांनी केले आहे. जुन-जुलैचे मानधन चार दिवसात मिळेल असे मंत्रालयातून सांगण्यात आले असल्याचे  श्रीम. परूळेकर यांनी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय मागण्यांबाबत 22 जुलैपासून संपूर्ण राज्यभर असहकार आंदोलन सुरू केले होते. यात राज्यातील 2 लाख 7 हजार कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे मासिक रिपोर्ट द्यायचे नाहीत, मोबाईलवर ऑनलाईन डेटा भरायचा नाही व ऑफीसने बोलाविलेल्या सभांवर बहिष्कार असा असहकार चालू होता. पगार काढणार नाही, नोकरीतून काढून टाकणार अशा सुपरवायझरच्या धमक्यांनाही कोणी भीक घातली नाही. महाराष्ट्र ते दिल्‍ली नाचक्‍की झाली. शेवटी महाराष्ट्र सरकारने 16 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढला व 1 ऑक्टोबर 2018 पासून मानधन वाढ मंजूर केली. सोमवार 19 ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या कृती समिती सभेत ना. पंकजा मुंडेंनी अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनातील फरक लवकरच देण्याचे मान्य केले. ऑगस्ट संपत आला तरी जून-जुलैचे मानधनही या सरकारने दिले नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांची उपासमार या सरकारला कशी दिसत नाही?  असाही सवाल परूळेकर यांनी उपस्थित केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here