कुडाळ : जिल्हा पुरवठा शाखेकडून सिंधुदुर्गात धान्य वितरित करणार्या ट्रक मालक-चालकांना संबंधित ठेकेदाराने गेल्या चार महिन्यांचे एक कोटींचे थकीत भाडे न दिल्यामुळे कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय धान्य गोडाऊनसमोर संघटनेने आपल्या गाड्या उभ्या करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ठेकेदाराने पूर्ण पेमेंट आदा करावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मोटार चालक-मालक संघटनेचे सावंतवाडी अध्यक्ष बावतीस फर्नांडिस यांनी केली. 1 ऑगस्टपासून वाहतूकदारांनी हे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात धान्य टंचाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा शाखेमार्फत सिंधुदुर्गात ट्रक मोटर चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून शासकीय धान्य पुरवठा केला जातो. हा धान्यपुरवठा 40 गाड्यांच्या माध्यमातून जिल्हाभर केला जातो. प्रत्येक महिन्याला 20 ते 25 लाख पेमेंट दिले जाते. या सर्व 40 गाड्यांचे एप्रिल-मे, जून, जुलै या चार महिन्याचे सुमारे एक कोटी रुपये थकीत आहेत. याबाबत बोलताना संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष बावतीस फर्नाडिस म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धान्य पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो. ठेकेदारांच्या माध्यमातून आम्ही आमच्या 40 गाड्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात शासकीय धान्याची वाहतूक करतो; मात्र थकीत पेमेंटमुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वेळी घ्यावे लागणारे डिझेल, ड्रायव्हर भत्ता, हमाली खर्च हा आम्हालाच करावा लागत आहे. शासकीय रोड टॅक्स आम्ही भरतो, तो टॅक्स न भरल्यास दंड तिप्पट आहे. त्याशिवाय, पर्यावरण कर दुप्पट आहे. सर्व शासकीय बाबी पूर्ण नसल्यास आरटीओकडून पासिंग केले जात नव्हते. या सर्व गोष्टी करताना आमचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वच गोष्टीतून आम्हाला मार्गक्रमण करताना अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी कार्यरत ठेकेदाराच्या माध्यमातून आम्हाला चार महिन्याचे सुमारे एक कोटी रुपये मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदार थकीत बिल देत नाही, शिवाय अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे सांगत आहे. त्यांनी पर्यायी वाहतूक निश्चित करावी. त्याला आमचा विरोध नाही. मात्र आमच्या 40 गाड्यांचे चार महिन्याचे थकीत पेमेंट त्यांनी तात्काळ द्यावे. जोपर्यंत हे सर्व बिल मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लोकशाही पद्धतीने काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. थकित पेमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत येथे एकही गाडी लावू देणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने त्यांनी दिला. ठेकेदाराने 1 मार्च 2018 ला याबाबतचे टेंडर घेतले होते. आमच्या संघटनने त्यांना सातत्याने सहकार्य केले. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही. भाड्यामध्ये सुद्धा अलीकडे त्यांनी एक हजार रुपयांची कपात केल्यामुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वाहतूक व्यवसायिक कर्जदार झाले असून गेले चार महिने थकित पेमेंट पगारामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. काही व्यवसायिकांनी फायनान्स घेतले आहे. त्यांना आता कंपन्याकडून गाडी जप्त करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यावेळी या पत्राची कॉपीसुद्धा दाखविण्यात आली. याबाबत संबंधित ठेकेदाराने तात्काळ दखल घ्यावी. आमचे सर्व थकीत पेमेंट अदा करावे अशी मागणी असल्याचे फर्नाडिस यांनी सांगितले. बाबल पावसकर, गुरू वालावलकर, सोएल खान, शरद धुरी, तुळशिदास शेलटे, विजय मालडकर, भाई तळेकर, अतुल ठाकूर, प्रमोद मागाडे, गजानन मयेकर आदी उपस्थित होते.
