शेतीसाठी गुंठ्याला एक हजार रुपये भरपाई द्यावी

0

रत्नागिरी : अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा बसला असून, मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी भातशेतीत राहिल्यामुळे ती कुजून गेली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना गुंठ्याला एक हजार रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी बहजन विकास आघाडीतर्फे सुरेश भायजे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रशासनाकडे सादर केले आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धुव्वांधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या नद्यांना आलेल्या महापुराने थैमान घातले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले, दुकाने उद्ध्वस्त झाली. त्याबरोबरच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. एक-दोन दिवस पाणी शेतात राहिले तर त्यामुळे नुकसान होत नाही. पण सुमारे ८ ते १० दिवस भात शेती पाण्याखालीच राहिल्याने रोपे कुजून गेली आहेत. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळा लावलेल्या भात रोपांवर साचल्याने नुकसान झाले आहे. शेतंच्या शेत कुजून गेल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेती नष्ट झाल्यामुळे वर्षभराची बेगमी करता येणार नही. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जात आहे. कोकणात गुंठ्याच्या जमिनी आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे निकष न लावता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति गुंठा १ हजार रुपये नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी बविआतर्फे करण्यात आली आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांचे या महापुरात नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे कोणी करावेत हे निश्चित झालेले नाही. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदार निश्चित करावी, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असेही निवेदनात नमूद केले आहे. तातडीने संबंधितावर जबाबदारी सोपवून पंचनामे करावेत जेणेकरुन मदत लवकर मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. यापूर्वीही पुरात शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली होती. मात्र, शेतकऱ्यांना प्रति गुंठा १०२० रुपये देऊन कुचेष्टा करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही याची दक्षता घेऊन भरपाईची रक्कम निश्चित करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here