दापोली : माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती युवासेनेचे राज्य विस्तारक ऋषिकेश गुजर यांनी दिली आहे. याप्रमाणेच दापोली राष्ट्रवादीने देखील दहीहंडी उत्सव रद्द केल्याचे जाहीर केले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वतोपरी मदत करा, असे आदेश शिवसैनिकांना दिले असून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक भान राखत शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले आहेत. दापोलीमध्येही माजी आमदार दळवी यांच्या पुढाकाराने शिवसेना व युवासेना यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मात्र, यावर्षी हा दहीहंडी उत्सव रद्द करुन या उत्सवासाठी येणारा सर्व खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला जाणार असल्याची माहिती यावेळी ऋषिकेश गुजर यांनी दिली. यावेळी माजी सभापती किशोर देसाई, माजी तालुकाप्रमुख शांताराम पवार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
