एलईडी मासेमारीचा निर्णय हा केंद्राचाच

0

दापोली : एलईडी मासेमारीचा निर्णय हा केंद्राच्या अखत्यारीतील असून राज्यामधून कोणी याबाबत अध्यादेश काढू शकत नसल्याचे मत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्‍त केले. खा. सुनील तटकरे हे दापोली दौर्‍यावर आले असताना हॉटेल वृंदावन सभागृहामध्ये कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. तटकरे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की एलईडी मासेमारी बंदीचा मुद्दा समोर येतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी काहींनी येथील मच्छीमार नेत्यांना केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेऊन एलईडी मच्छीमारी बंद करू, असे सांगितले. मात्र, मतदान झाल्यानंतर काही वेळातच ही मच्छीमारी पुन्हा सुरू झाली हे कोळीबांधवांनी जवळून पाहिले आहे. आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पुन्हा राज्यातील मंत्र्यांना एलईडी मच्छीमारी बंदी करण्याबाबत स्वप्न पडू लागली आहेत. मात्र, हा विषय राज्याचा नाही हे आत्तापर्यंत त्यांनी समजून घेतले नाही. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात आपण हा मुद्दा सभागृहात मांडला. तसेच कोळीबांधवांसाठी कृषी खात्यामार्फत ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना दुष्काळग्रस्त म्हणून मदत दिली जाते त्याप्रमाणे मच्छीमारांना द्यावी,  अशी मागणी केली. त्यामुळे कोणी किती थापा मारल्या तरी एलईडी बंद करण्याबाबत सुरुवातीपासूनच आपण व आ. संजय कदम आग्रही होतो व यापुढेही राहू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. केंद्रात आणि राज्यात कोणाचे सरकार आहे हे महत्त्वाचे नसून स्थानिक पातळीवर आपले सरकार आहे हे निश्‍चित. माझ्या पहिल्या अधिवेशनामध्ये दापोलीमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांचा निधी आणू शकलो असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला दापोली मतदार संघातून अपेक्षित यश मिळाले नसले तरी विरोधकांना आपण कमी मताधिक्य घेऊ दिले हेही महत्त्वाचे आहे. दापोली मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार हे विद्यमान आमदार कदमच असतील. आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी ठामपणे उभे असून दापोली मतदार संघातील जनता ही पैशाच्या नव्हे तर आपुलकीच्या आणि प्रेमाच्या सोबत उभी राहते हे आपण लोकसभा निवडणुकी दरम्यान अनुभवले असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, सभापती राजेश गुजर, युवानेते अजय बिरवटकर, उपसभापती दीपक खळे, चंद्रकांत बैकर यांच्यासह पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, सरपंच आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here