टोकियो : भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी न्यूझीलंडवर ५-० असा दणदणीत विजय मिळवून ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने स्पर्धेतील राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने केलेल्या पराभवाची परतफेड केली आहे. राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने भारताचा २-१ ने पराभभव केला होती. भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. भारताला सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. पण, पुन्हा एकदा पेनाल्टी कॉर्नर मिळाला व कर्णधार हरमनप्रीतने यावेळची संधी दवडली नाही. हरमनप्रीतने ७ व्या मिनिटाला भारताचे खाते उघडून १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर शमशेर सिंगने १८ व्या, निलकांत शर्माने २२ व्या, गुरसाहबजीत सिंगने २६ व्या मनदीप सिंगने २७ व्या मिनिटाला झटपट गोल करून भारताला भक्कम ५-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामना संपेपर्यंत कायम राहिली. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, अंतिम सामना आव्हानात्मक होता. भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. झटपट गोल करण्यात आम्हाला यश येत गेले. न्यूझीलंडने राऊंड रॉबीन फेरीत आमच्यावर मात केली होती. मात्र, त्या पराभवाचे दडपण न घेता टीमच्या सर्व सदस्यांनी चांगला खेळ करून विजेतेपद पटकाविले. आधीच्या सामन्यातील चुका या सामन्यात आम्ही टाळल्या. संघाची बचावफळीही भक्कम केली होती. प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची एकही संधी देण्यात आली नाही.
