रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण पंचायत समितीच्या सभागृहात करोनाचा वाढता संसर्ग व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आढावा बैठक घेतली. खा. राऊत यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. कामथे रुग्णालयात पुरेशी कर्मचारीसंख्या आहे. केवळ सफाई कामगारांचा प्रश्न आहे. तो आपण मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी खा. राऊत यांच्याकडे तक्रारी केल्या. स्वॅब घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास बसवून ठेवले जाते, रिपोर्ट उशिरा मिळत आहेत, अशी तक्रार काहींनी केली. चिपळूण शहरात १३ आरोग्य पथकांच्या माध्यमांतून घरोघरी तपासणी सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी दिली. आता खेर्डी, चिपळूणसह ग्रामीण भागातही घरोघर ऑक्सिजन मीटर व टेंपरेचर मीटरच्या माध्यमातून तपासणी सुरू करा, अशी सूचना खा. राऊत यांनी आरोग्य विभागाला केली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 03-Aug-20