रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळेतील गावठी दारू अड्यांवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अचानक धाडी टाकल्या. वेगवेगळी पथके स्थापन करून एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्याने मिरजोळेतील दारू माफियांमध्ये एकच गोंधळ उडाला. या कारवाईत ३ लाख ९८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस दलातील सात अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी चार वर्षांपूर्वी मिरजोळेत दारूबंदी व्हावी यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यानंतर काही कालावधीसाठी मिरजोळेतील दारूअड्डे बंद झाले होते. परंतु, मागील काही कालावधीपासून मिरजोळेत गावठी निर्मिती पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, अनिल लाड यांनी मिरजोळेत ही कारवाई केली. कारवाईसाठी रत्नागिरी शहर, पूर्णगड पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांची पथके बनवण्यात आली होती. मंगळवारी पहाटेच्यावेळी मिरजोळेत एकाचवेळी छापे टाकण्यात आला. या छाप्यात मिरजोळे पाटीलवाडी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि अन्य उपयुक्त साहित्य असा एकूण ३ लाख ९८ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार सहा वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात सुरज यशवंत पाटील, श्रेया तेजस पाटील आणि मोनाली मोरेश्वर पाटील यांच्यासह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिरजोळेतील दारू अड्यांवर टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाकुडसाठा मिळून आला. याची माहिती वन विभागाला कळवून वन विभागाकडून अवैध लाकुड साठ्याबाबतही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून एकूण ७७ हजार ३८५ इतक्या किंमतीचा लाकुड साठा जप्त करण्यात आला.
