राज ठाकरे यांची उद्या कोहिनूर मिल प्रकरणात चौकशी

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या (ता. २२) अंमलबजावणी संचलनालयाकडून कोहिनूर मिल प्रकरणात चौकशी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  नये म्हणून पोलिसांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम देण्यात आला आहे. मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून  पोलिसांनी अडथळा निर्माण केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ईडीकडून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांची काल (ता.२०) पाच तास चौकशी करण्यात आली. आज (ता.२१) राजन शिरोडकर ईडीसमोर हजर झाले. त्यांच्यासोबत उन्मेष जोशीही हजर असून त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी निवेदन सोशल मीडियावर प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तत्पूर्वी, ठाणे शहरात पुकारण्यात आलेला बंद राज यांनी आवाहन केल्यानंतर मागे घेण्यात आला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमण्याचा दिलेला आदेश मागे घेतला. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. कळव्यातील मनसैनिक प्रविण चौगुलेने आत्महत्या केली. राज यांनी निवेदनातून ईडीच्या कार्यालयाबाहेर कोणीही येऊ नये असे आवाहन केले आहे. ईडीकडून सरकारी क्षेत्रातील कंपनी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात तपास सुरू आहे. उन्मेष जोशींच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोर ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती. राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र या व्यवहारामध्ये आयएलएफएसला मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचा ईडीचा दावा आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here