दापोली : तालुक्यातील टेटवली येथील पंकज मनोज कदम या विद्यार्थ्याचा सर्पदंशानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत वैद्यकीय अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत हर्णै रस्त्यावर मृतदेह ठेवून नातेवाईकांनी आंदोलन केले. टेटवली-मळेकरवाडी येथील पंकज मनोज कदम याला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विषारी सर्पाने दंश केला. हा साप चावल्यानंतर पंकजने स्वतः साप मारून भावंडांना उठवले. काका यांच्या मदतीने दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठले; मात्र त्याच्यावर उपचार करण्यास वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तेथील परिचारिकेने प्राथमिक उपचार केले. चार तास झाले तरी वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी उपस्थित झाले नाहीत. यानंतर बुधवारी सकाळी 8 वाजता एक वैद्यकीय अधिकारी आले असता, त्यांनी पंकज याची अत्यवस्थ अवस्था पाहून त्याला तातडीने येथून हलवा, असे नातेवाईकांना सांगितले. यानंतर नातेवाईकांनी शहरातील एका खासगी दवाखान्यात त्याला तपासून पुढे डेरवण रुग्णालय गाठले; परंतु तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी दुपारी 2 वाजता मृतदेह दापोली पोलिस ठाण्याजवळ आणला; मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिस दिरंगाई करीत असल्याचे लक्षात येताच दुपारी साडेतीन वाजल्यापासून रस्ता अडविण्यात आला. दापोली पोलिस ठाण्यासमोर हे आंदोलन केले. यावेळी पाऊण तास मार्ग ठप्प झाला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मोहन पाटील, सचिन शेळके व कर्मचारी या ठिकाणी हजर होते. पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. छायाचित्रण करून व ग्रामस्थानच्या प्रतिनिधीसमोर शवविच्छेदन केले जाईल. शिवाय संबंधित वैद्यकीय अधिकार्यांवर गुन्हा नोंदविला जाईल, असे उपस्थितांना सांगितले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला.
