ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडिज दौर्यावर जाणार आहे; पण तत्पूर्वी भारताच्या युवा संघांने कॅरेबियन मैदान मारले. त्यांनी वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धची 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे.
रविवारी झालेल्या पाचव्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर 8 विकेटस्नी मात करीत मालिकेत 4-1 ने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाचे सलामीवीर शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी आक्रमक अर्धशतकी खेळी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शुभमन गिलने 69 तर ऋतुराज गायकवाडने 99 धावा केल्या. भारतीय संघाने 33 व्या षटकांतच वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान पूर्ण केले. ऋतुराजला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला.
आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलने आक्रमक सुरुवात करीत 29 चेंडूंत अर्धशतक झळकावले. या मालिकेतील गिलचे हे तिसरे अर्धशतक आहे. शुभमन गिल फटकेबाजी करीत असताना ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने ऋतुराजच्या साथीने संघाचा डाव सावरला. ऋतुराजने फटकेबाजी करीत भारतीय संघाची धावसंख्या भराभर वाढवण्याकडे कल दिला. 99 धावांवर ऋतुराज माघारी परतला. केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले. ऋतुराज माघारी परतल्यानंतर कर्णधार मनीष पांडेने श्रेयस अय्यरच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.