रत्नागिरी : ज्याठिकाणी एस. टी. बस बंद पडेल त्याच ठिकाणी तिची दुरुस्ती करता येणे आता शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत ब्रेक डाऊन व्हॅन राज्यातील सर्व आगारांना देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागात चिपळूण, रत्नागिरी दोन आगारामध्ये ही व्हॅन दाखल झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या व्हॅन महामार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. एसटीच्या गाडीला कोठेही अपघात झाला तर त्या गाडीला जवळच्या डेपोत आणावे लागत असे. गाडी आणण्यायोग्य नसेल तर घटनास्थळावर जाऊन दुरुस्तीचे काम करावे लागत होते. त्यानंतर इतर कामकाजासाठी ही गाडी जवळच्या विभागीय कार्यशाळेत पाठविली जायची. यासाठी प्रत्येक बसगाडीत एक टूल कीट असायची. अपघाती घटनेच्या वेळी ही टूल किट काढून बसगाडी दुरुस्तीचे पर्याय खुले असायचे; मात्र बसगाडीतील बिघाड चालक-वाहकाच्या आटोक्यातील नसेल तर बसगाडी दुरुस्तीची जबाबदारी इतरांवर सोपविली जायची. यासाठी कायमस्वरूपी पर्याय शोधला जात असताना ‘ब्रेक डाउन व्हॅन’ची संकल्पना पुढे आली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील प्रत्येक आगारास ब्रेक डाऊन व्हॅन देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली असून, राज्यातील प्रत्येक आगारासाठी ब्रेक डाउन व्हॅन सक्रिय होत आहे.
