रत्नागिरी : गेल्या पंधरा वर्षांत अनेक विकास कामे मतदारसंघात झाली आहेत. परंतु येथील युवा वर्गाच्या हाताला काम मिळावे, यासाठी पुढील पाच वर्षात आपण दोन हजार बेरोजगारांच्या नोकरीचा प्रश्न सुटेल, असा प्रकल्प आणणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष व आ. उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीतील दैवज्ञ भवन येथे मागील 5 वर्षाच्या कामाचा आढावा घेणारा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयांवर बोलताना आ. सामंत म्हणाले की, आगामी कामाचे नियोजन सांगताना ते म्हणाले की, कोकणातील निसर्ग जपणारे प्रकल्प या ठिकाणी येत नाहीत. मात्र, आपण यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. काही कारखानदारांशी चर्चा झाली असून, 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्याशी बैठक होणार आहे. त्यानंतर कोणत्या पध्दतीची कारखानदारी या ठिकाणी आणायची हे निश्चित केले जाणार आहे. रत्नागिरी मतदार संघातील किमान दोन हजार तरुणांना रोजगार मिळेल, या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. डॉ. सुभाष देव यांनी खंत व्यक्त केली होती की, नोकर्याच निर्माण होत नसल्याने येथील सुशिक्षित तरुणाई रत्नागिरी सोडून जात आहे. त्यावर बोलताना पुढील पाच वर्षात रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. त्याचप्रमाणे रत्नागिरी मतदार संघातील सर्व रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्तांची अवस्थाही पावसामुळे अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे या सर्वांचे डांबरीकरण करुन ते मजबूत केले जाणार आहेत. मागील काही वर्षात रत्नागिरीत वाढलेल्या दादागिरी व टिकेला साथ न देता येथील जनतेने शिवसेनेला सहकार्य केले आहे. त्यामुळे आताही जनता विकासाच्या मागेच उभी राहिल असा विश्वासही आ. सामंत व्यक्त केला. तालुक्यातील 36 गावांसाठी बावनदीवरुन सुमारे 125 कोटींची नळपाणी योजना राबवण्यासाठी शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागाचाही पाणी प्रश्न सुटेल. रत्नागिरी शहराची नळपाणी योजनेचे काम सुरु असून पुढील मे महिन्यापर्यंत हे काम मार्गी लागेल व शहरवासीयांना पाणी उपलब्ध होईल असा विश्वास आ. सामंत यांनी व्यक्त केला. शहरातील दैवज्ञ भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, सीए, प्राध्यापक यांच्यासह पाचशे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत प्रत्यक्ष आमदार उदय सामंत प्रवेशद्वारावर उभे राहून फूल देऊन करीत होते. पाच वर्षात 1900 कोटींच्या केलेल्या व सुरु असलेल्या, काही मंजूर झालेल्या कामांचा आढावा आ. सामंत यांनी यावेळी घेतला.
