वेंगुर्ले : चिबुड व कणगी या पिकांचा भाजीपाला पिकांमध्ये समाविष्ट करून त्यांना आंबा, काजू व इतर फळ पिकांप्रमाणे निकष लावून नुकसानग्रस्त शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वेतोरे येथे दिले. ना. अनिल बोंडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील भाजीपाला नुकसानग्रस्त शेतकर्यांची भेट घेत शेतकर्यांशी चर्चा केली. गोगटे मंगल कार्यालयात झालेल्या या भेटीवेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शरद चव्हाण, उपसभापती स्मिता दामले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेतोरे सरपंच राधिका गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, साईप्रसाद नाईक, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, सचिन वालावलकर, अजित राऊळ, बाळा सावंत आदी उपस्थित होते. वेतोरे गावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिबुड, कणगी व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते.यातून मिळणार्या पैशातून उदरनिर्वाह केला जातो. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे या सर्व पिकाचे नुकसान झाले. या पिकाची शासन दरबारी नोंद नसल्याने नुकसान भरपाई मिळत नाही. गेल्या चार दिवसात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकसानीची दखल घेवून कृषि विभागाची यंत्रणा कामाला लावून झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तसा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तरी शासकीय निकषाच्या पलिकडे जाऊन कृषि विभागाने बनविलेल्या अहवालाप्रमाणे नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वेतोर्यातील शेतकर्यांतर्फे दीपक नाईक यांनी केली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही कृषिमंत्र्यांना वेतोरेतील नुकसानी संदर्भात माहिती दिली. बागायतीला नुकसान भरपाई देताना हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येते. बागायतीची नुकसान भरपाई देताना सध्या असलेले मापदंड बदलण्यात यावेत. कृषि विभागातील रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी ना. केसरकर यांनी केली. डॉ. बोंडे म्हणाले, यावेळच्या पुराची भीषणता अधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवेदनशील भूमिका घेतली आहे. शेतकर्यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवून 10 हजार प्रतिकुटुंब नुकसान भरपाई देण्यात येत आहे. शेतकर्यांच्या पाठीशी राहाण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकर्यांनी पंतप्रधान किसान पेन्शन योजना, स्व. गोपीनाथ मुंडे विमा योजना आदींचा लाभ घ्यावा. कृषि सहाय्यकांनी ग्रा. पं. कार्यालयामध्ये बसून शासनाच्या योजना प्रत्येक शेतकर्यांपर्यत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. वेतोरे येथील जयश्री जनार्दन गावडे यांनी काजू युनिटसाठी 2015 साली फलोत्पादन विकास अभियानातंर्गत काजू प्रक्रिया केंद्र उभारणीकरिता कृषि विभागाच्या संमतीने कुडाळ बँकेकडून 30 लाख रुपये घेवून प्रक्रिया केंद्राची उभारणी केली व कृषि आयुक्त पुणे याच्याकडे अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. मात्र, त्याचे अनुदान आपल्याला अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात आपण गतवर्षी उपोषण पुकारले. त्यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी आपणास आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप आपणास अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. यावर कृषिमंत्र्यांनी कृषि अधिकार्यांना या संदर्भात जाब विचारुन अनुदान का रखडले याचा खुलासा येत्या दोन दिवसात करा. एखादा अधिकारी जाणुनबुजून जर शेतकर्यांवर अन्याय करत असेल तर त्या अधिकार्यास घरी बसवू ,असा दमही त्यांनी दिला.
