रत्नागिरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेत पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे त्यांना बुडून प्राण गमवावे लागत आहेत. अशा पर्यटकांसाठी स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि देवस्थानचे कर्मचारी ‘संकटमोचक’ ठरत आहेत. गत 12 वर्षांमध्ये या ‘संकटमोचकांनी’ जवळपास 184 पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे, यातील एकही पर्यटक हा रत्नागिरी जिल्ह्यातील नाही. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे गणरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या तीर्थक्षेत्राला निसर्गाने भरभरून देणगी दिली आहे. गणेश मंदिराच्या लगतच विशाल असा समुद्र आहे. या तीर्थक्षेत्रात दिवसाला शेकडो, महिन्याला हजारो तर वर्षाला लाखो भाविक पर्यटक भेट देत असतात. गणेश दर्शनासोबतच समुद्रात पोहोण्याचा मनमुराद आनंद लुटण्यात हे भाविक कम पर्यटक अतिउत्साही होतात. पाण्यात उतरताना स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ पाण्यातील धोकादायक ठिकाणे सातत्याने पर्यटकांना सांगत असतात. मात्र ‘अति उत्साही, संकटात नेई’ याप्रमाणे घटना घडत आहेत. 2007 सालापासून 2014 पर्यंत सुमारे 100 जणांचे प्राण वाचवण्यात व्यावसायिकांना यश आले आहे. तर त्याच कालावधीत 35 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या कालावधीत अत्याधुनिक सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे 35 जणांना प्राण गमवावे लागले. मात्र 2015 नंतर स्थानिक व्यावसायिक असलेल्या लोकांकडे वॉटर स्पोर्टस्साठी अत्याधुनिक बोटी आल्या आणि त्यानंतर प्राण गमवणार्यांची संख्या तुलनेत कमी झाली. 2015 पासून ऑगस्ट 2019 पर्यंत सुमारे 84 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. तर यावर्षी चार जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील एकाचा हृदयविकारानेच मृत्यू झाला होता. त्यामुळे बुडून मृत्यू झालेल्यांची गत पाच वर्षातील संख्या ही 3 आहे. प्राण वाचलेल्या 184 पर्यटकांसाठी ‘संकटमोचक’ म्हणून जय गणेश स्वयंरोजगार एकात्मिक संस्थेचे सुरज पवार, सानिका वॉटर स्पोर्टस्चे नाना डोर्लेकर, मोरया वॉटर स्पोर्टस्चे उदय पाटील, सचिन मयेकर, मिथुन माने, शरद मयेकर, सचिन धामणस्कर, दत्ताराम माईन, अमेय केदार, श्रीहरि पाटील, अजित केदार, दिनेश ठावरे, विश्वास सांबरे, सचिन अवसरे, हेमंत गावणकर, अनिल लाकडे, नंदकुमार बोरकर, राज देवरूखकर, योगेश पालकर यांच्यासह सुमारे 60 ते 70 जणांचा ग्रुप धाऊन आला आहे. हे ‘संकटमोचक’ अधीकृत जीवरक्षक नसतानाही ‘आपण समाजाचे काही देणे लागतो’ या भावनेतून त्यांचे कार्य आजतागायत सुरू आहे. असे असतानाही मध्यंतरीच्या काळात गणपतीपुळे ग्रामपंचायतीने याच समाजभान असणार्या जीवरक्षकांना त्यांचे व्यवसाय करण्याचे ठिकाण खाली करण्यासाठी अनधिकृत अतिक्रमण नावाची नोटीस पाठवून त्यांच्या पोटावर पाय येईल याची व्यवस्था केली. ग्रामपंचायतीने त्यांना पर्यायी जागा समुद्रापासून दूर दिली. त्यामुळे बुडणार्या पर्यटकांपर्यंत वाचविण्यास जाण्यासाठी विलंब होत आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारची शासकीय, ग्रामपंचायतीकडून मदत न घेता आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचे जीव वाचवण्याचे कार्य देवस्थानचे कर्मचारी, व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थ करीत असतात. मात्र त्यांची शासनाकडून, ग्रामपंचायतीकडून परवडच होत आहे.
