मालवण : मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने स्वंतत्र मच्छीमार खाते निर्माण करुन मच्छीमारांना मुख्य प्रवाहात आणण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्यांना जसे किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध आहे तशीच मच्छीमारांनाही क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातुन दैनंदिन खर्च व या व्यवसायातील येणार्या खर्चास मदत होईल. यात 2 लाखा पर्यंत कर्ज 2 टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. यात ट्राँलर, बल्याव, रापणकर, महिला बचत गट या सर्व स्तरातील मच्छीमारांना खर्चानुसार कर्जाची पात्रता निश्चित करण्यात येईल. यासाठी मच्छीमार व्यावसायिकांनी जिल्ह्यातील आपल्या भागातील मच्छिमार सहकारी संस्थेमध्ये जाऊन आपले नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, मासेमारीचा प्रकार, मच्छीमारी व्यवसायातले वार्षिक उत्पन्न, बँक डिटेल्स (बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड) ही माहिती वैयक्तीकरित्या नोंदवावी. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 हजार पेक्षा जास्त कुटुंबाना थेट फायदा होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
