कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी ऊस संशोधन केंद्राच्या जागेची केली पाहणी

0

वैभववाडी : नापणे गावात प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, तहसीलदार रामदास झळके, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, कृषी उपाधीक्षक बागवान, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, गावचे तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ऊस यंशोधन केंद्र व्हावे, यासाठी येथील ऊस उत्पादक  शेतकर्‍यांची गेली अनेक वर्षे  मागणी होत होती. या मागणीचा पाठपुरावा प्रमोद जठार यांनी केला, आता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ऊस संशोधन केंद्र उभे राहिल असे ना. बोंडे यांनी सांगितले. या संशोधन केंद्राचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु  यासाठी केलेली मेहनत, खतांसाठी व मशागतीसाठी काढलेले कर्ज व ऊस उत्पादनाचा ताळमेळ बसत नाही. यासाठी शेतातील माती तपासणी करुन जमिनीला पूरक ऊस लागवड केल्यास शेतकर्‍यांना योग्य उत्पादन मिळेल. तसेच या केंद्राच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन व चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. हे ऊस संशोधन केंद्र हे कोकणातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आर्थिक विकासाचे केंद्र ठरेल असा विश्‍वास ना. बोंडे यांनी व्यक्‍त केला. जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयांना या ऊस संशोधन केंद्राचा शैक्षणिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. शेती विषयक प्रात्यक्षिक, विविध उपक्रम राबविण्यास विद्यार्थ्यांना केंद्र उपलब्ध होणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here