सावंतवाडी : ठाकरे कुटुंबीयाने कधीही खिशात हात घातलेला नाही. ते दुसर्याकडूनच घेणार आणि देणार. त्यामुळे आपद्ग्र्रस्त परिस्थिती उलटून पंधरा दिवस झाल्यानंतर ठाकरे यांचा दौरा म्हणजे देखावा आहे. मंत्री, खासदार यांनी या देखाव्यामध्ये पूरग्रस्तांना काय दिले? असा सवाल माजी खा. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सावंतवाडी येथे आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, राजू बेग, गुरुनाथ पेडणेकर, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, पूर परिस्थिती ओसरल्यानंतर शायनिंग करतात याला नेता नव्हे तर दिखावा म्हणावे,अशा शब्दात शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौर्याची त्यांनी खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे यांना ग्रामपंचायत काय असते ते माहीत आहे का?असा सवाल राणे यांनी करत शिवसेना आ. वैभव नाईक यांच्या संवाद यात्रेचीही खिल्ली उडवली. कोकणामध्ये झालेल्या आपद्ग्रस्त स्थितीबाबत चुकीचे चित्र दाखवले जात आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरस्थितीची चर्चा होते. मात्र, कोकणाची चर्चा होत नाही. कोकणामध्ये पाचशे कोटींचे नुकसान झाले असून पालकमंत्र्यांचे वरती काही चालत नाही. 500 कोटी रुपये मागण्याची गरज असून पालमकमंत्री व खासदार ते आणू शकत नाही अशा शब्दात त्यांनी ना.केसरकर व खा.राऊत यांची खिल्ली उडवली. 2019 च्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री बदलणार असून यांच्याकडून काही होणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान संजू परब यांच्या भावना राणे साहेबांपर्यंत पोहोचवू, असे त्यांनी आश्वासन दिले. पूरस्थितीच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आणि आपण स्वतः पोहोचलो असल्याचे राणे म्हणाले.
