खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर केले धरणे आंदोलन

0

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना गेल्या काही वर्षापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, वसतीगृहाच्या बोगस कारभाराबाबत आवाज उठवूनही सुधारणा होत नसल्याने विद्यार्थ्यांनी बुधवारी समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी दोन वर्षापूर्वीही वसतीगृहातील असुविधांबाबत उठाव केला होता. त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वसतीगृहातीलकारभारसुधारण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज दिली होती. परंतु या वसतीगृहातील कारभार अद्यापही सुधारणा झालेली नाही. वसतीगृहातील बोगस कारभाराचा फटका गरीब होतकरु विद्यार्थ्यांना बसत आहे. याबाबत वसतीगृहाचे गृहपाल व समाजकल्याण अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करुनही अधिकारी वर्गाकडून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होऊन तीन महिनेच होत आलेले असताना, विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात आणखी किती समस्यांचा सामना करावा लागेल यामुळे वसतीगृहातील विद्यार्थी चिंतीत आहे. वसतीगृहाचा कारभार सुधारावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृह विद्यार्थी संघटनेने केली आहे. बुधवारी समाजकल्याण कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन विद्यार्थ्यांनी केले. यावेळी समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here