बासेल (स्वित्झर्लंड) : आपल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर पाचव्या मानांकित भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन तैपेईच्या बिनमानांकित पाई यू पोला 21-14, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभूत करीत येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसर्या फेरीत धडक मारली. या फेरीत तिची गाठ वेंडे चेन अथवा झँग बेईवेन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी पडणार आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच बिनमानांकित चीन तैपेईच्या पाई यू पोने सिंधूला चांगलेच झुंजविले. पहिल्या गेममध्ये सिंधूने 11-7 अशी आघाडी घेतली. नंतर आपला हाच फॉर्म कायम ठेवत तिने गुणांची कमाई करीत गेम 21-14 असा आपल्या नावे केला. सामन्याच्या दुसर्या गेमची सुरुवात सिंधूने चांगली केली. सलग तीन गुणांची कमाई करीत तिने आघाडी घेतली; पण चीन तैपेईच्या खेळाडूने अचूक फटक्यांच्या बळावर गुणांची कमाई करीत अंतर कमी केले. एकवेळ दुसर्या गेममध्ये सिंधूकडे 13-11 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने आपली आघाडी वाढवत ती 18-13 अशी केली. चीन तैपेईच्या खेळाडूने गुण मिळवले. मात्र, सिंधूने आपले वर्चस्व कायम राखत गेम 21-15 असा आपल्या नावे केला. याबरोबरच तिने तिसर्या फेरीतील स्थानही निश्चित केले. महिला दुहेरीत भारताच्या मेघना जक्कमपुडी व पूर्विशा जोडीला जपानच्या शिहो तनाका व कोहारू योनेमोतो जोडीकडून 21-8, 21-18 असे पराभूत व्हावे लागले.
