जिल्ह्यातील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याच्या सूचना

0

रत्नागिरी : आगामी गणेशोत्सव आणि सणानिमित्त जिल्ह्यात आपत्ती अथवा दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्ह्यातील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात साकव दुरुस्तीचा कार्यक्रम रखडलेला असून अनेक साकव मोडकळीस आले असल्याने ही खबरदारी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साकव दुरूस्ती कार्यक्रमात १६ कोटीचा निधी साकव दुरूस्तीसाठी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यापैकी साकव दुरूस्तीसाठी केवळ एक कोटी ३५ लाखाचा निधी मिळाल्याने अनेक साकव मोडकळीस आले आहेत. या साकवांची दुरूस्ती रखडलेली आहे. साकव दुरूस्तीसाठी ८२३ साकवांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामध्ये २४५ साकवांची उभारणी नव्याने करावी लागणार होती. त्यापैकी ३६७ साकवांची दुरूस्ती करण्यात आली असून १६साकव पुन्हा उभारण्यात आले आहे. अनेकदा जिल्ह्यातील साकवांचा वापर करताना वर्दळ वाढल्यास अनेक दुर्घटना घडल्या आहते. गणेशोत्सव शिमगा आणि अन्य सणावाराच्या दिवसात साकव कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी शिमग्याचा शेंडा नेताना संगमेश्वर येथे कळंबुशी येथील साकव मोडून अनेकजण जखमी झाले होते. राजापूर तालुक्यातही गणपतीमूर्ती नेताना साकव मोडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे आगामी गणेशोत्सव काळात खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील या संपर्क माध्यमांची भक्कमता तपासण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने साकवांचा स्ट्रक्चरल ऑडीट सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार दुरूस्तीसाठी असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या साकव वापरण्यासाठी निर्बंध घालण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here