रत्नागिरी जि.प. उभारणार स्वतःची आपत्कालीन यंत्रणा

0

रत्नागिरी : मुसळधार पावसाळयात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेने स्वतःची आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंधरा लाख इतक्या निधीची सुरूवातीला तरतूद करण्यातआली आहे. पावसाळ्यात एखादी समस्या उद्भवल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन निधीतून तत्काळ तरतूद करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये या विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. गुरूवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. अनेक गावांमध्ये पुरस्थिती उद्भवली. गावागावात पाणी साचल्याने अनेक गावांचा शहर आणि तालुक्यासोबतचा संपर्क तुटला होता. रस्त्यावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्याने अनेक मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. तसेच गावात नद्यांचे पाणी शिरल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थीतीत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या भागात तत्काळ मदत पोहचावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. आपत्कालीन निधीसाठी तरतूद करून या निधीतून आपत्कालीन परिस्थीतीत उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळयात किंवा इतरवेळी येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मदतकार्य पोहचवताना आधी कामाचे अंदाजपत्रक त्यानंतर निविदा प्रक्रिया, मग ठेकेदार नियुक्ती आदी प्रक्रियांचे सोपस्कार पार पाडावे लागतात. यामुळे दुर्घटनाग्रस्त भागात मदतकार्य पोहचवण्यात प्रंचड दिरंगाई होते. आपत्कालीन परिस्थीतीसाठी जिल्हा परिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असावी यासाठी जिल्हा परिषदे प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. यासाठी आपत्कालीन निधी म्हणून पहील्या टप्प्यात पंधरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी रस्त्यावर दरड पडल्यास जिल्हा परिषदेच्या आपत्कालीन निधीतुन तत्काळ जेसीबीच्या मदतीने दरड कोसळलेला रस्ता मोकळा करता येणे शक्य होईल. या विषयावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली असून गुरूवारी होणाऱ्या सर्वसाधारण चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसात अनेक भागात पूरस्थिती होती. पूरस्थितीने अनेक गावातील पिके तीन ते चार दिवस पाण्याखाली होती. यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून उभारी देण्यासाठी आपत्कालीन निधीतून मदतीचा हात देता येईल का? याचाही निर्णय गुरूवारी होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यामध्ये दुपार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी, कडधान्य खरेदीसाठी अनुदान देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here