रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड येथील वाहनधारकांना आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीसाठी रत्नागिरीला माराव्या लागणाऱ्या खेपा आता बंद होणार आहेत. आरटीओ विनोद चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे चिपळूण पिंपळी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण होऊन तो येत्या सोमवार पासून सुरु केला जाणार आहे. आठवड्यातील गुरुवार, शुक्रवार व कामकाजाचे शनिवार या पूर्वनियोजित वेळेत चिपळूण ट्रॅकवर काम होईल. जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड येथील वाहनधारकांनी आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीसाठी या ट्रॅकचा प्राधान्याने उपयोग करून घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वरील पाचही तालुक्यातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी रत्नागिरीत खेपा माराव्यालागतात होत्या. या होणार्या त्रासाला कंटाळून या पाच तालुक्यांसाठी स्वतंत्र ट्रॅकची मागणी होती. गेली अनेक दिवस हा प्रश्न भिजत पडला होता. आरटीओ विनोद चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेतला. जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून त्याच्या आदेशानुसार एप्रिल 2018 रोजीच्या आदेशाने पिंपळी बुद्रूक येथे अतिरिक्त ब्रेक टेस्ट ट्रॅक करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. शासनाच्या गृह विभागाने 4 ऑगस्ट 2018 शासन निर्णयानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारणीसाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली. सप्टेंबर 2018 ला याबाबत चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी देण्यात आला. ट्रॅकचे कामकाज पूर्ण करुन गेल्या महिन्यात ते आरटीओ विभागाला हस्तांतरित करण्यात आले. उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता पिंपळी त्याबाबत तत्काळ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
वाहनधारकांना सुविधा उपलब्ध होणेसाठी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र कामकाज हे ऑनलाइन पद्धतीने कामकाज सुरू करण्यात आले आहे. कार्यकारी अधिकारी यांच्या रिक्त पदांमुळे कार्यालयीन कामकाज हाताळून ब्रेक टेस्ट ट्रॅक कार्यान्वित कामासाठी परिवहन आयुक्तांनी धुळे येथील एका मोटार वाहन निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील हातखंबा व चिपळूण येथील ट्रॅकसाठी वेगवेगळी पूर्वनियोजित वेळ घेणे यासाठीची प्रणाली बदलाबाबत एनआयसी पुणेद्वारे एनआयसी दिल्ली यांना मे 2019 मध्ये विनंती केली होती. मात्र परंतु तशा प्रकारची सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे कळविले आहे. हातखंबा ट्रॅकवर आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी ब्रेक टेस्टचे कामकाज होणार आहे. पिंपळी येथील कामकाजासाठी समन्वयक अधिकारी म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
