रत्नागिरी : जिल्हा परिषदेचा कारभार करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल या पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. त्या हुकुमशाहीने कामकाज करतात, असा आरोप करत यापुढे त्यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आता अडचणीत येणार आहेत. जि. प.ची सर्वसाधारण सभा छ. शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी जि. प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवले, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, सदस्य उदय बने, रचना महाडिक, मुग्धा जागुष्टे, नेत्रा ठाकूर, अण्णा कदम, संतोष थेराडे, महेश म्हाप, परशुराम कदम, दीपक नागले, महेश नाटेकर, गोपाळ आडिवरेकर, चंद्रकांत मणचेकर यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या कामकाजावरून ही सभा गाजली. तब्बल सहा तास ही सभा चालली. गोयल या मनमानी कामकाज करत असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. ग्रामसेवकांचे तोंडी आदेशाने मानधन अडवणे, कर्मचार्याचे नियमबाह्य बदल्या करणे, राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, सदस्यांशी दुरूत्तरे करणे, बांधकाम सभापतींना चालक न देणे आदी मुद्यांसह अनेक बाबींचा ठपका ठेवण्यात आला. यापुढे असेच हुकुमशाहीचे कामकाज चालणार असेल तर आमच्या अधिकारात अविश्वास ठराव टाकू, असा इशारा यावेळी सदस्यांनी दिला. अगदी बाके वाजवून याला सर्व सदस्यांनी समर्थन दिले. जलशिवारमुक्त कार्यक्रमांतर्गत 2 कोटी 40 लाख रूपये पडून असल्याची बाब संतोष थेराडे यांनी उघडकीस आणली. यामुळे पाणी पुरवठा विभागाला धारेवर धरण्यात आले होते. राजापूर तालुक्यात शिक्षक समायोजन चुकीचे झाल्याने 20 शाळा शुन्य शिक्षकी झाल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. तरी ही प्रशासनाची चूक त्वरित सुधारावी, अशी मागणी दीपक नागले यांनी केली. विद्यर्थ्यांचा स्पर्धाबाह्य शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्ता कक्ष स्थापन करावा, अशी मागणी परशुराम कदम, महेश म्हाप व दीपक नागले यांनी केली. यावेळी प्रत्येक तालुक्यात असा कक्ष स्थापन केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. ग्रामसेवकांच्या मानधन थांबवण्याच्या विषयावरूनही मुख्य कार्यकारी अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले. तोंडी आदेश देऊन मुख्य कार्यकारी अधिकार्यांना मानधन रोखल्याचे यावेळी उघडकीस आले. यानंतर महेश म्हाप, अण्णा कदम, उदय बने यांनी आक्रमक पवित्रा घेत हे मानधन त्वरित करावे, अशी मागणी यावेळी केली. सभा सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल या वारंवार सभागृहाबाहेर जात होत्या, त्याचबरोबर जि.प. अध्यक्षा बोलत असताना त्या मधेच बोलत होत्या. यावर काही सदस्यांनी आक्षेप घेत ही गोष्ट सभाशास्त्राला धरून नसल्याचे सुनावले.
