बांदा : जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महापुरात शेतकर्यांच्या झालेल्या शेतीची नुकसानीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकर्यांना तिप्पट भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रब्बी हंगामातील शेतीसाठी शेतकर्यांना मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ यांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे राहणार आहे, असा विश्वास कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिला. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री बोंडे बुधवारी बांद्यात आले होते.यावेळी त्यांनी बांदा ग्रामपंचायत सभागृहात शेतकर्यांशी संवाद साधला.मंत्री बोंडे यांनी बांदा, इन्सुली, शेर्ले, निगुडे येथील शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांनी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांना निवेदने सादर केलीत.पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आ. राजन तेली, प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपसरपंच अक्रम खान, जि.प.सदस्य श्वेता कोरगावकर, पं.स.सदस्य शीतल राऊळ, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळे, तालुका कृषी अधिकारी एस.बी.चौगुले, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, महसूल मंडळ अधिकारी वार. वाय. राणे, अशोल सावंत, किशोरी बांदेकर आदी उपस्थित होते.
