शृंगारतळी : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी अनुदान तसेच मौलाना आजाद योजनेतून भरीव अर्थसहाय्य या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन रत्नागिरी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शृंगारतळी येथे केले. शृंगारी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शृंगारी उर्दु हायस्कूलला राज्यसभा खा. वंदना चव्हाण यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन खा. सुनील तटकरे व गुहागरचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्बास कारभारी होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जि. प. सदस्य प्रविण ओक, विरोधी गटनेते विक्रांत जाधव, पं. स. सदस्य सुनील पवार, अल्पसंख्यांक सेलचे लतिफ लालू, पद्माकर आरेकर, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार उपस्थित होते. यावेळी खा. तटकरे पुढे म्हणाले की, पंतप्रधान सडक योजनेच्या तिसर्या टप्प्यातील निधी व कामाबाबत उच्चस्तरीय अधिकार्यांबरोबर आपली चर्चा झालेली आहे. त्याचा आराखडा लवकरच जाहीर होईल. जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकूल उभारण्याचा मानस आहे. वेळणेश्वर व गुहागरसाठी पर्यटनाच्या माध्यमातून विशेष फंड देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. भास्कर जाधव व आपण एकत्रच आहोत व यापुढेही राहू. या परिसरातील विकासासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वासही खा. तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आ. जाधव म्हणाले की, आमदारांचा निधी हायस्कूलसाठी खर्च करता येत नाही. त्यामुळे संस्थेला दिलेला शब्द पाळण्यासाठी व त्यांची अडचण दूर करण्यासाठी राज्यसभा सदस्या वंदना चव्हाण यांना विनंती करुन त्यांच्या निधीतून या वर्गखोल्या तयार झाल्या आहेत. उर्दु हायस्कूलच्या अनेक समस्या आहेत त्याकडे कोणीही पाहत नाहीत. माजी खासदार गीतेंनीही संस्थेला वर्गखोल्या बांधून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अन्य समाजाच्या व धर्माच्या माणसांची गीतेंनी कधीही कदर केली नाही व त्यांची तशी मानसिकताही नाही. 40 वर्षांची गुहागरच्या विकासाची भूक मी एकटा भागवत होतो. परंतु आता त्यात आपल्या खासदारांची साथ मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
