मुंबई : कोहिनूर मिलच्या खरेदी प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल साडेआठ तास चौकशी केली. राज यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक असल्याने त्यांना पुन्हा बोलावण्याची गरज भासेल असे वाटत नाही, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या एका अधिकार्याने सांगितले. दरम्यान, कितीही चौकशा झाल्या तरी मी माझे मुद्दे मांडतच राहणार, थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर दिली. आज दुपारी बाराच्या सुमारास राज बेलॉर्ड इस्टेट परिसरातील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. या प्रकरणाची मनी लाँडरिंग कायद्याखाली चौकशी करीत असलेल्या राणा बॅनर्जी यांनी राज यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. कोहिनूर मिलची खरेदी, उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांच्याशी भागीदारी तसेच आयएल अँड एफ एस या कंपनीशी या संदर्भातील सुमारे वीस प्रश्नांची प्रश्नावली आधीच काढून ठेवण्यात आली होती. या प्रश्नांना काही उपप्रश्नदेखील बॅनर्जी यांनी विचारले. उन्मेश जोशी, राजन शिरोडकर यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे राज यांच्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती, असे समजते. राज यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल किंवा नाही याबद्दल सूत्रांनी काहीही सांगण्यास नकार दिला. त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक असून त्यांनी पूर्ण सहकार्य केले असे एका अधिकार्याने सांगितले. राज यांचे म्हणणे नोंदवून घेण्याचे काम रात्री सुमारे साडेआठपर्यंत चालले होते. त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली गेली. दरम्यानच्या काळात त्यांना घरून आणलेले जेवण घेण्याची मुभा देण्यात आली.
