चिपळूण : राष्ट्रवादीचे नेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आगमन चिपळुणात गुरुवार दि. २९ रोजी सायंकाळी ५ वा. होणार असून यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यात्रेसोबत उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना-भाजप, काँग्रेसराष्ट्रवादीकडून विविध यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे नेतृत्व अभिनेते व खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार कोकणात ही यात्रा या महिन्याच्या अखेरिस येत आहे. चिपळूण येथे गुरुवार दि. २९ रोजी यात्रेचे आगमन होणार आहे. सायंकाळी ५ वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रानजिकच्या पटांगणावर यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे नेते आ. अजित पवार, छगन भुजबळ, रायगडचे खा. सुनील तटकरे,गुहागरचे आ. भास्कर जाधव,प्रदेशसरचिटणीसशेखर निकम आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये डॉ. कोल्हे हे प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी परिश्रम घेत आहेत.
