रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आणि ‘जय हो’ प्रतिष्ठानतर्फे शहरातील आठवडा बाजार येथे जिल्हास्तरीय दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्यांना ११ हजार व चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीतर्फे दरवषीही या स्पर्धे चे आयोजन करण्यात येते. शासनाच्या नियमानुसार ३० फुटांचीच म्हणजे ५ थरांचीच ही हंडी असणार आहे. सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जे पथक कमी वेळेत थर उभारून सलामी देईल त्याला विजेते घोषित करण्या येणार आहे. या स्पर्धे दरम्यान पथकातील गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून, स्पर्धास्थळी अॅम्बुलन्स ठेवण्यात येणार आहे. तसेच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, या कलाकारांच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना देण्यात येणारे पारितोषिक रत्नागिरीचे माजी नगरागध्यक्ष कै. उमेश शेट्ये यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. कै. सदानंद मयेकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर शैक्षणिक साहित्य देणार आहेत. यावेळी शहराध्यक्ष निलेश भोसले आणि अभिजीत ऊर्फ मनू गुरव उपस्थित होते.
