राजापूर: बीएसएनएल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

0

राजापूर : मागील वर्षभर पाचल परिसरातील सातत्याने बंद पडत असलेल्या बीएसएनएलच्या सेवेमुळे परीसरवासीय त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे सातत्याने तक्रारी करुनदेखील त्याकडे बीएसएनएलचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने या कारभाराबद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान अधिकारी वर्गाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेचे नेते आप्पा साळवी यांनी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तालुक्याच्या पूर्व परीसरातील मोबाईलसेवा डायलिसीवर जाऊन पडली असून तालुक्याच्या महत्वपूर्ण अशा या विभागातून इतरत्र संपर्क साधणे कठीण बनले आहे. मागील दोन वर्षांपासून ही समस्या सुरु असून या सेवेतील तांत्रिक त्रुटी संबंधीत विभागाला दूर करता आलेल्या नाहीत. आठवड्यातून किमान पाच ते सहा दिवस टॉवर बंद असतात. केव्हातरी चूकून नेटवर्क मिळते पण नंतर ते बंद पडते, अशी रामभरोसे सेवा बीएसएनएलची असल्याने परीसरातून त्याविरुध्द प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी सूचना देवून देखील त्या पायदळी तुडविल्या गेल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व परीसरातील मोबाईल सेवेतील अनागोंदी कारभाराची दखल शिवसेनेचे माजी विभागप्रमुख अप्पा साळवी यांनी घेतली आहे. जर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना पाचल परीसरातील बीएसएनएल सेवेकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर आता तीव्र जनांदोलनाशिवाय पर्याय नसून लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा साळवी यांनी दिला आहे. दि. १० सप्टेंबरच्या आसपास आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here