साखरपा : पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक हात सरसावत आहेत पण सर्वस्व गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला विद्यार्थी धावून जात सामाजिक भान जपल्याचे उदाहरण साखरपा येथे पहायला मिळत आहे. कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना गणवेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जनतेसाठी समाजातील विविध घटक मदत करत आहेत. साखरपा येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढे येत सामाजिक भान जपले आहे. दरम्यान,हा निधी मागील आठवड्यात मुख्याध्यापिका लीना कबनूरकर यांच्याकडे जमा करण्यात आला. पुरामुळे करवीर तालुक्यातील आरे गावातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या निधीतून त्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शाळेतील ८० विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप सोमवारी आरे विद्या मंदिराच्या प्रांगणात केले. यावेळी चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर आणि गुरुकुल विभाग प्रमुख अमित पंडित उपस्थित होते. कबनूरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या मदतीबद्दल आरे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शेख तसेच सरपंच, उपसरपंच यांनी आभार मानले.
