पावस मार्गावर एसटीला ‘शटल’ सेवेचा पर्याय

0

रत्नागिरी : कमी भारमानामुळे एसटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. कमी भारमान असणाऱ्या फेऱ्या बंद केल्या तर तेथील विद्यार्थी, वृद्ध, रूग्ण यांचे हाल होतात. यावर शटल सेवेचा पर्याय असून, पावस दशक्रोशीत ही पद्धत वापरण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाच्या विचाराधीन आहे. रत्नागिरीतून पावस व त्यापुढील गावात सोडण्यात येणाऱ्या एसटीच्या गाड्यांत येताना प्रवासी फारसे नसतात. तर रात्रवस्तीच्या गाड्यांनाही कमी भारमान असते. रत्नागिरीतून पावसमार्गे गणेशगुळे, मावळंगे, हर्चे, गावखडी, पूर्णगड, रिंगीचीवाडी, डोर्ले, आंबोळगड, नाखरे, चांदोर आदी ठिकाणी एसटीची सुविधा आहे. या गावांमध्ये गाडी गेल्यानंतर अनेकदा परतताना कमी भारमानात आणावी लागते. त्यामुळे सकाळी व रात्रवस्तीची फेरी थेट ठेवून दिवसभरातील फेऱ्या पावसमधून सोडण्याचा एसटीचा प्रस्ताव आहे. रत्नागिरीतून पावसला शटल सर्व्हिसच्या गाड्या सुटतील व पावस स्थानकातून त्या त्या गावांमध्ये विशेष फेऱ्या सोडण्याबाबत प्रस्ताव आहे. येत्या २३ ऑगस्टला पावस परिसरातील सरपंचांची बैठक बोलावण्यात आली असून, एसटी प्रशासनाडून या प्रस्तावाविषयी माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरी वाहतुकीचा तोटा कमी करण्यात एसटी प्रशासनाला यश आले आहे. शहरी वाहतुकीची ४७ नियते होती. त्यातील कमी भारमानाच्या फेऱ्यांचा अभ्यास करून ही नियते कमी करण्यात आली. यामुळे प्रवाशांविना धावणाऱ्या फेऱ्या कमी होऊन शहरी वाहतुकीचा तोटा कमी करण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here