पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. आज (ता. २३) पीएम मोदी यांनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधताना सरकारने घेतलेल्या धोरणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काँग्रेसलाही चिमटे काढले. पीएम मोदी यावेळी म्हणाले, की द्वितीय सरकार सत्तेत येऊन जास्त काळ उलटललेला नाही. फक्त ७५ दिवस झाले असल्याने सेलिब्रेशन सुरु राहिले असते, पण तसे काही न करता धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करून अनेक निर्णय घेतले. गेल्या पाच वर्षात भारतात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. फुटबॉल प्रेमींच्या देशात मी आलो आहे त्यामुळे गोलचे महत्त्व तुम्हाला नक्कीच माहित आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत असे गोल ठेवले, जे अशक्य मानले जात होते, पण आम्ही अनेक गोष्टी पूर्ण करुन दाखवल्या. ठरलेल्या काळात अपेक्षेपेक्षा जास्त बँक खाती भारतात सुरु करण्यात आली, असे मोदी यांनी फ्रान्समधील भारतीयांसमोर बोलताना सांगितले. मोदी पुढे म्हणाले, न्यू इंडियामध्ये भ्रष्टाचार, कुटुंबवाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना थारा नाही. ज्याप्रकारे या गोष्टींना पायबंद घालण्यात आला तो यापूर्वी कधीच असा घालण्यात आला नाही. थकणे आणि थांबण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. नेत्यांना आपण दिलेली आश्वासन विसरण्यात जास्त आनंद मिळतो, पण मी त्यांच्यापैकी नाही. जनतेने आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी दिली आहे. फक्त सरकार चालवण्यासाठी नाही, न्यू इंडिया निर्माण करण्यासाठी ही संधी आहे. मोदी यांनी तिहेरी तलाक पद्धतीला दिलेल्या मुठमातीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. आम्ही अमानवीय कृतीला संपवून टाकल्याने त्यांनी नमूद केले. तिहेरी तलाक रद्द केल्याने कोट्यवधी मुस्लिम महिलांचे आशीर्वाद देशाचे भले करणार आहेत.
