नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या निराशाजनक अवस्थेत जात असल्याने देशभरातून केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवर मोठा खुलासा करताना देशात अभूतपूर्व मंदीची स्थिती असून अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगितले. निर्मला सीतारामण जगभरात मंदीचा सामना केला जात असल्याचे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, जगभरातील अभ्यास केल्यास लक्षात येईल, की अशी परिस्थिती फक्त भारतात नसून सर्वांनाच सामना करावा लागत आहे. जगाशी तुलना केल्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. जीएसटी प्रणाली येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणा हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सीतारामण यांनी नमूद केले.
