गावी येऊ न शकणाऱ्या चाकरमान्यांच्या घरी ग्रामस्थ साजरा करणार गणेशोत्सव

0

रत्नागिरी : गावी आल्यावर क्वारंटाईन, मुंबईत गेल्यावर पुन्हा क्वारंटाईन, त्यामुळे गणपतीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची द्विधा अवस्था झाली आहे. चाकरमान्यांची ही अडचण लक्षात घेऊन हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे. शिमगोत्सवासाठी गावी पालखीसाठी आलेले चाकरमानी गेले दोन ते अडीच महिने लॉकडाऊनमुळे गावीच अडकून पडले होते. हे सर्वजण मुंबईला परत गेल्यानंतर पुन्हा गणेशोत्सवासाठी गावी येणे त्यांना शक्य नाही. त्यातच गावी आल्यावर दहा दिवसांचे क्वारंटाईन, पाच दिवसांचा गणेशोत्सव आणि पुन्हा मुंबईत गेल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यातही एका दिवसासाठी यायचे म्हटले तरी कोरोना चाचणी अत्यावश्यकच आहे. या अटींमुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकमान्यांची अडचण झाली आहे. त्यातही नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गणेशोत्सवासाठी गावी येऊ न शकणाऱ्या पण गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये अशा चाकरमान्यांसाठी हातिस, टेंब्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील बंद घरामध्ये ग्राम कृती दलातर्फे दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारा खर्च चाकरमानी मुंबईतून गावी पाठवून देणार आहेत. कांचन नागवेकर यांच्या संकल्पनेला चाकरमान्यांनीही प्रतिसाद दिला असून, गावातील ५ कुटुंबियांनी त्याला होकार दर्शविला आहे. त्यामुळे गावी येऊ न शकणाऱ्या चाकरमान्यांच्या घरीही यावर्षी गणेशोत्सव साजरा होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:51 PM 18-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here