जिल्ह्यात आतापर्यंत 1200 गाव कोरोनाला रोखण्यात यशस्वी

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. शहरासहित गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत . प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 1551 गावांपैकी 1219 गावांमध्ये अजूनही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेले 2,945 रुग्ण 332 गावांमधील आहेत. शहरी भागात सर्वाधिक प्रमाण आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णामध्ये वाढ होत चालली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळला होता. हा रुग्ण परदेशवारी करून आला होता. त्यावेळी महिनाभराच्या कालावधीत रुग्णांची संख्या 6 इतकी झाली. त्यानंतर सुमारे 14 दिवसांच्या कालावधीत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नव्हता. मुंबई, ठाणे आणि पुणेकर चाकरमानी गावात येण्यास सुरूवात झाल्यावर संगमेश्वर तालुक्यात पहिला मुंबईकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. चाकरमान्यांची संख्या वाढत असतानाच जुलै महिन्यापासून स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होवू लागला. जिल्ह्यातील केवळ 342 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचातीनी शासनाच्या कोरोनाबाबतीतच्या आदर्श नियमावलीची तंतोतंत अंमलबजावणी केली. त्यासाठी ग्रामस्थांनीही चांगली साथ दिली. जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त पदे असली तरी जे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत ते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. ग्रामकृतिदलाने परजिल्ह्यातून येणार्‍या लोकांसाठी केलेले नियोजन यशस्वी ठरत आहे; मात्र शहरी भागामध्ये परजिल्ह्यातून येणार्‍यांची वाढती रेलचेल, कोविड योध्दे आणि त्यांचे कुटूंबिय कोरोना बाधित आढळून येत असल्याने चिंतेची गोष्ट बनली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडूनही पाठपुरावा सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 19-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here