रत्नागिरी : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी निवृत्त वेतन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना ऑनलाईन देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या योजनेत ग्रामस्तरावर आपले सरकार सेवा केंद्रात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने पेन्शन योजना लागू केली आहे. कोकणातील जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदाच लागू करण्यात येणार ही योजना निवडक जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राविण्यात येणार आहे. यामध्ये कोकणात रत्नागिरी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या योजनेत पहिल्या तीन वर्षात या योजनेअंतर्गत केंद्र शासनातर्फे सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. ही योजना सर्व लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांसाठी (एसएमएफ) एक स्वैच्छिक आणि योगदान स्वरूपाची आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक किमान ३,०००/- रुपये निवृत्तीवेतनाची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. यासाठी नोंदणी ऑनलाईन करण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावर सेवाकेंद्रात यासाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे.
