ठाणे : गेले अनेक दिवस भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले असूनही भाजपपासून दूर असलेले नारायण राणे आता स्वाभिमान पक्षासह भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याच्या प्रारंभी दिले. यामुळे कणकवलीतून भाजपकडून नीतेश राणे हे कणकवली मतदारसंघातून रिंगणात उतरतील, हे निश्चित झाले आहे. खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत मोठा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावले होते. पण, त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणे शक्य झाले नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांचा पक्ष भाजपात विलीन होत असेल तर त्यांचे स्वागतच करण्यात येईल. तसेच सर्व घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ, असे सांगत घटक पक्षांना दिलासा दिला. नारायण राणे विधानसभेत भाजपसोबत राहिल्यास कणकवलीची भाजपची जागा राणेंचा मुलगा नीतेश यांना मिळणार आहे; तर कुडाळ, सावंतवाडी या दोन जागा शिवसेनेकडे राहणार आहेत. मात्र, शिवसेना राणेंना मदत करणार का आणि राणे शिवसेनेला मदत करणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार आहे.
