शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे असलेल्या ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याला राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले. त्यानंतरही मूळ मालकाने गडाला कुलूप घातल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. याची दखल घेऊन गुहागरच्या तहसीलदारांनी स्वतः या गडावर जाऊन काही शिवप्रेमींसह हे कुलूप उघडले आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला हा अनेक वर्षांपासून खासगी मालकांच्या ताब्यात आहे. या गडावर शिवकालीन तटबंदी व बुरूज असून गडाचा परिसर विस्तीर्ण आहे. गडावर राज्यभरातले शिवपे्रमी कायम येत असतात. मालकाचा ताबा असल्याने हा किल्ला अद्याप पारतंत्र्यात कसा, असा प्रश्न उपस्थित करून शिवप्रेमींनी अनेकवेळा या ठिकाणी आंदोलनेही केली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून वर्षभरापूर्वी जाहीर केला होता व त्याठिकाणी तशाप्रकारचा फलकही लावण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरातून अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देत होते. काही दिवसांपूर्वी या गडाचे मूळ मालक यांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. यावरही मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्यानंतर गुरुवारी गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे व शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अॅड.संकेत साळवी व काही शिवप्रेमींनी याठिकाणी जाऊन व गडाच्या मूळ मालकाला सोबत घेत गडाचे कुलुप काढले आणि गड मोकळा केला.
