चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शहरात वृक्षतोड व अन्य अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. महामार्गालगत असणार्या शासकीय कार्यालयाच्या समोरील झाडे शुक्रवारी (दि.23) कटरच्या साहाय्याने तोडण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर रस्त्याच्या कामासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासून महामार्गालगतची झाडे तोडण्याचे काम सुरू झाले. संबंधित ठेकेदाराने झाडे तोडण्याचे काम सुरू केले असून चेतक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. मांढरे तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता मराठे यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक तांबडे या ठिकाणी आले. त्यांनी हे काम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. अजूनही पावसाळा सुरू आहे. आपण महामार्गाच्या चौपदरीकरण संदर्भात अनेक तक्रारी वरिष्ठ पातळीवर पाठविल्या आहेत. त्याची दखल घेतलेली नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर ही बाब तहसीलदार जीवन देसाई, प्रांताधिकारी यांना कळविण्यात आली. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग, संबंधित ठेकेदार कंपनी व तांबडे आणि काही नागरिकांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्यावतीने बाजू मांडताना, शहरातील चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरुन आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे काम थांबविण्यासंदर्भात कोणतीही सूचना नाही. तसेच शहरातील रस्त्यासाठी भूसंपादन झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच संबंधित लोकांना नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. आधीच नुकसानभरपाई देण्यास एक वर्षाची दिरंगाई झाली म्हणून या लोकांना व्याजासहीत पैसे देण्यात आले आहेत. पावसाळा संपताच काम सुरू करण्यात येईल अशी सूचना संबंधितांना देण्यात आली होती. त्यानुसार सुरुवातीच्या टप्प्यात झाडे तोडण्यात येत आहेत. या शिवाय इमारतींची कंपाऊंड, बांध, सपाटीकरण हाती घेण्यात आले आहे. सध्यातरी राहत्या घरांना हात न लावण्याची भूमिका आहे, असे संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरूच राहील, असे सांगण्यात आले. यानंतर दिवसभर चौपदरीकरणाचे काम सुरूच होते. जेसीबी, कटर, क्रेन अशी यंत्रसामुग्री महामार्गावर तैनात करुन काम सुरू होते.
