कोकणवासीयांनी फलोत्पादनाची कास धरायला हवी : जी. डी. जोशी

0

रत्नागिरी : भात आणि नाचणीच्या आतबट्ट्याच्या शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाची कास धरली, तर कोकणवासीय श्रीमंत होतील, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. गोविंद जोशी यांनी केले. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर शाखेच्या पुढाकाराने देवाचे गोठणे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांकरिता झूम मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संघाचे सहसचिव भास्कर चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, करोनामुळे अनेक चाकरमानी गावी आले आहेत. त्यांनी शेती केली. अनेकांनी प्रथमच शेती केली. शेतीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो आश्वासक आहे. संघाचे तालुका शाखाध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली. ओबीसी समन्वयक चंद्रकांत बावकर म्हणाले की, इतर व्यवसाय बंद पडले. फक्त शेती व्यवसाय ठप्प झाला नाही. होणारही नाही. त्यामुळे करोना ही संधी समजून शेतकऱ्यांनी जमिनीशी संवाद साधला पाहिजे. हितगूज केले पाहिजे. जमिनी हक्काची जमीन असावी. शेतीविषयक काही करता येऊ शकते का, गटशेती, सामूहिक शेतीचा विचार करता येतो का, यादृष्टीने विचार करावा. कारण मनुष्यबळ कमी झाले आहे. कोकणातील लोकांनी कोकणातच राहिले पाहिजे. शेतीचे प्रेम वाढावे. डॉ. जोशी यांनी फलोद्यान, उत्पादन वाढवण्यासाठी काय केले पाहिजे, सामुदायिक फलोद्यानासाठी काय केले पाहिजे आणि फलोद्यानात कोणत्या संधी आहेत याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, फलोद्यानाला पर्याय नाही. भात, नाचणीची शेती आतबट्ट्याची ठरते. त्याला फलोद्यानाची जोड द्यायला हवी. आपल्याकडे असलेल्या चांगल्या आणि वेगळ्या झाडाची नोंदणी केली, तरी त्यापासून उत्पन्न मिळू शकते. नोंदणीच्या अर्जाचा नमुना कोकण कृषी विद्यापीठाकडे मिळेल. खेडच्या तालुक्यातील सरवटी भाताची नोंदणी या पद्धतीने एका शेतकऱ्याने केल्याची माहिती देऊन ते म्हणाले की, आपल्याकडच्या वेगळ्या चवीच्या आंब्याची किंवा कोणत्याही कृषी उत्पादनाची नोंदणी केली, तरी उत्पन्न मिळू शकते. अन्नाबरोबरच पोषणमूल्य मिळाले पाहिजे. त्यासाठी फलोद्यान आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले की, केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी अनेक पिके कोकणात होतात. आंबा, काजू, चिकू, फणस, करवंद, कोकम ही पिके पावसावर चांगली येतात. याशिवाय भाज्या, कंदवर्गीय फळे, पाणी न देता येणारी पिके, दालचिनी, काळी मिरी अशी मसालापिके ही कोकणाची ताकद आहे. अशी पिके पोषणमूल्याच्या बाबतीतही उपयुक्त असतात. कारण ती आरोग्यपूर्ण आणि संरक्षक असतात. फलोद्यानापासून रोजगाराच्या संधीही भरपूर उपलब्ध होतात. आंबा, काजू एकाच वेळी येतात. दर मिळत नाही. दर पडतो. नुकसान होते. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांची साथ घेतली पाहिजे. सामुदायिक फलोत्पादनाचाही विचार शेतकऱ्यांनी करावा. फलोद्यानाची पंचसूत्री सांगताना डॉ. जोशी म्हणाले की, प्रत्येकाने हवामान आणि जमीन, पोत, पोषणमूल्य, जीवजंतू, जमिनीचा सामू यांची तपासणी सातत्याने करावी. कोकणात फलोद्यानासाठी हवामान उपयुक्त आहे. तरीही जमिनीचे आरोग्य दरवर्षी तपासावे. जमिनीनुसार पिकाची आणि जातीची, वाणाची निवड. नारळ, कोकमाची झाडे लावावीत. विद्यापीठाला भेट द्यावी. तेथून माहिती घ्यावी. उत्पादन वाढविण्यासाठी आंब्याच्या बागेत सुरण, नारळबागेत अननस, केळी, सुरण अशी आंतरपिके घ्यावीत. नव्या लागवडीनंतर नियोजनबद्ध पद्धतीने मुख्य पीक येईपर्यंत उत्पन्न मिळण्यासाठी वर्षभर भाजीपाला कराव, असा सल्लाही त्यांनी दिला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 20-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here