कणकवली : गणेशोत्सवाच्यानिमित्ताने सिंधुदुर्गात येणार्या चाकरमानी आणि गणेश भक्तांच्या सोयीसाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज झाला आहे. मुंबई, उपनगर, पुणे तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात येण्यासाठी आतापर्यंत 87 गाड्यांचे आरक्षण झाले आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील विविध भागात नियमित जाणार्या पाच गाड्या व हंगामी नऊ गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठीही ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आल्याची माहिती एसटीचे सिंधदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर एसटीच्या सज्जतेबाबत विभागीय कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. यावेळी वाहतूक पर्यवेक्षक अशोक राणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रकाश रसाळ म्हणाले, गणेशोत्सवासाठी 30 ऑगस्टपासून सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा ओघ सुरू होणार आहे. यंदा चाकरमान्यांना घेऊन सुमारे 90 ते 100 बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहेत. आतापर्यंत 87 बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई व उपनगरातून 66 गाड्या, पुणे तसेच इतर भागातून 21 गाड्यांचा समावेश आहे. 30 ऑगस्ट रोजी 31 गाड्या, 31 ऑगस्ट रोजी 55 गाड्या तर 1 सप्टेंबर रोजी 1 गाडी सिंधुदुर्गात दाखल होईल. या गाड्यांच्या संख्येत अजूनही वाढ होणार आहे. याखेरीज जिल्ह्यांतर्गत वाहतुकीतही वाढ होणार असल्याने प्रवाशांची उपलब्धता तसेच भारमान लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावांत जादा बसेस सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गातून विविध भागात जाण्यासाठी 57 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. मुंबईकडे जाणार्या 5 गाड्या सुरू आहेत. यात मालवण-मुंबई, कणकवली-बोरीवली, देवगड-बोरीवली, विजयदुर्ग-मुंबई या बसफेर्यांचा समावेश आहे. त्याशिवाय 28 ते 1 सप्टेंबर या कालावधीत 9 हंगामी गाड्या चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल होणार आहेत. तर 7 ते 13 सप्टेंबर या कालावधीत त्या गाड्या परतीचा प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी-बोरिवली, मालवण-बोरिवली, कणकवली-बोरिवली, कुडाळ-बोरीवली, देवगड-बोरीवली, विजयदुर्ग-बोरीवली, फोंडाघाट-बोरीवली, कणकवली-पाचलमार्गे बोरीवली, वेंगुर्ले-बोरीवली या गाड्यांचा समावेश आहे. रसाळ म्हणाले, प्रवासी चाकरमानी भाविकांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत तळेरेलगत साळीस्ते येथे चेकपोस्ट सुरू केले जाणार असून ते 24 तास सुरू राहणार आहे. याठिकाणी वाहतूक नियंत्रक व अन्य अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. याशिवाय कणकवली आणि सावंतवाडी येथे फिरते दुरुस्ती पथक तैनात असणार आहेत. गणेशोत्सवाच्या सात दिवसांच्या कालावधीत अंतर्गत जादा व नियमित गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांमधून लिंकिंगच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी बुकिंग आणि ग्रुप बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. एस.टी.च्या गट आरक्षणाला यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजयदुर्ग भागातील प्रवाशी मुंबईहून रेल्वेने रत्नागिरी येथे येतात. त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकातूनही गाड्यांची सोय उपलब्ध केली असल्याचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सांगितले.
