किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 608 कोटींचा प्रस्ताव

0

रत्नागिरी : चक्रीवादळाने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटात आणल्यानंतर जिल्ह्याच्या किनारीभागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा सुमारे 608 कोटीचा नवा प्रस्ताव महावितरण कंपनी शासनाला सादर केला आहे. यापूर्वी रत्नागिरी शहरपरिसासाठी मंजूर झालेल्या 94 कोटीच्या प्रकल्पाचे काम सध्यासुरू आहे. जिल्ह्याचा नवा प्रस्ताव मंजूर झाल्यास वादळ वार्‍यातही जिल्ह्याला अखंडित विद्युत पुरवठा मिळणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरासाठी सुमारे 94 कोटीचा भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. सुरवातीला फक्त रत्नागिरी शहराचाच विचार झाला होता. मात्र निसर्ग चक्रीवादळाने महावितरणला मोठा तडाखा दिल्यामुळे महावितरण कंपनीने भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ 608 कोटीचा नवा प्रस्ताव तयार करून मंजूरीसाठी पाठविला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महावितरणकडुन हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामध्ये भूमिगत वीज वाहिन्यांसाठी रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण 1 व 2, राजापूर 1 व 2, गुहगर, दापोली 1 व 2, मंडणगड 1 प्रभागांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी कोकण परिमंडळाने 608 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. निसर्ग वादळाचा मोठा तडाखा किनारपट्टीला बसला. वीज वाहिनीवर झाडे कोसळून पुरवठा ठप्प झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ते अडिच महिन्याचा कालावधी गेला. याशिवाय सुमारे 35 कोटीच्या दरम्यान कंपनीचे नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या विद्युत तारांचे जाळे उघड्यावर असल्याने किनारीभागात ही मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून महावितरण कंपनीने जिल्ह्यातील किनारी भागातील हा प्रस्ताव तयार केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:40 PM 21-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here