साखरपा : ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. गेले पाच महिने थकीत असलेले मानधन आणि आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे २७ हजार संगणक परिचालकांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद सुरू केले आहे. गेले पाच महिने थकित असलेले मानधन त्वरित मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे. या शिवाय अन्य थकित मागण्याही संघटनेकडून मांडण्यात आल्या आहेत. यात आयटी महामंडळाकडून परिचालकांना कायम स्वरूपी नियुक्ती देणे हे मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली आहे. परिचालकांना किमान वेतन १५ हजार मिळावे ही मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिचालकांनी वेळोवेळी केलेले सर्वेक्षण यांचे मानधनही अद्याप मिळालेले नाही. त्यात मागील वर्षी केलेला प्रधानमंत्री आवास योजना आणि शेतकरी कर्जमाफी योजना यांचा समावेश आहे. वर्ष होऊनही या योजनेचे कमिशन शासनाने दिलेले नाही. राज्यभरात गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येवून ठेपला आहे. पाच महिने मानधन न मिळाल्यामुळे हा उत्सव कसासाजरा करायचा, असा प्रश्न परिचालकांना पडला आहे. त्यामुळेच शासनाला जाग यावी, यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे राज्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
