रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीतील वाहन चालकांसाठी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे उभारण्यात येणाऱ्या ब्रेक टेस्टींग २६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या ट्रॅकसाठी उपविभागीय प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवार, शुक्रवार व शनिवार हे तीन दिवस निश्चित केले आहेत. त्यामुळे चिपळूणसाठी वाहनधारकांना कोटाही वाढवून देण्यात आला आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी जिल्ह्यातील वाहनचालकांना रत्नागिरीतील हातखंबा येथे गाड्या घेऊन यावे लागत होते. त्यामुळे मोठा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत होता. यापार्श्वभूमीवर चिपळूण येथे मोठे आंदोलनही उभारण्यात आले. त्यामुळेच पिंपळी येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यात आला. हा ट्रॅक आता २६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. प्रत्येक आठवड्याला सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी हातखंबा येथे व गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार कामकाजाच्या दिवशी चिपळूण पिंपळी येथे वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण होणार आहे. यासाठी वाहनांचा कोटाही वाढवून देण्यात आला आहे.काही वाहनधारकांनी २२ सप्टेंबरपर्यंत योग्यताप्रमाणपत्रनुतनीकरणासाठी वेळ घेतली आहे. त्यामुळे रत्नागिरीत २२ सप्टेंबरपर्यंत नियमित ब्रेक टेस्ट होणार आहे. दरम्यान, उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, खेड, मंडणगड, गुहागर या सर्व तालुक्यातील वाहन चालकांनी २६ ऑगस्टपासून गुरुवार, शुक्रवार व शनिवार कामकाजाच्या दिवसाच्या पूर्वनियोजित वेळा चिपळूण पिंपळी ट्रॅकच्या घेण्यात याव्यात असे आवाहन उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.पिंपळी बु. येथील कामकाजासाठी समन्वयक अधिकारी म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहेत.
