आरोग्य संपन्नतेचा उत्सव

डॉ. दिलीप पाखरे फिजिओथरेपिस्ट, रत्नागिरी.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

आता गणपतीचे आगमन झाले आहे. ‘ॐ नमोजी आद्या’ यात मानवीय संकल्पना श्री गणेशाच्या ठायी अर्पण व्हाव्यात, यासाठीच या दैवतापुढे नतमस्तक व्हावं, ‘श्री गणेशाचे आगमन म्हणजे आनंदाचं आगमन. क्षणभर सर्वार्थाने क्षणभर विश्रांतीचं आगमन, ध्यान धारणेचं आगमन, भक्तीमयतेच्या सुस्वराचं आगमन, त्याचे स्मरण म्हणजे सकारात्मक शक्तीचे आगमन, एकोप्याचे आगमन, रंगरंगोटी, घर सजावटीचे आगमन, एकत्र येऊया, सुखे राहुया,’ या संकल्पाचे आगमन आणि आपल्या कार्यक्षमतेला ऊर्जेची हमी देण्याचे आगमन असते. म्हणूनच जगभर गणेशोत्सव आज हर्षभरित मनाने साजरा करतात आणि वर्षभर आरोग्याच्या हमीची ऊर्जा प्राप्त करतात.

सार्वजनिक गणेशोत्सवात ‘देवा आमच्या सर्वांचं जीवन चांगलं कर, आरोग्य संपन्न कर, निर्मितीक्षम कर, सुखसंवादी कर आणि एकोप्याचे कर’ अशी संकल्पना असते. घरगुती गणेशोत्सवात आमच्या कुटुंबाचे, नातलगांचे आणि शेजारी-पाजारी यांचे जीवन सुखी संपन्न कर, अशी संकल्पना असते. म्हणूनच जगभर या ‘प्रसन्नमय देवतेची’ यथासांग आपल्या ‘समज’ या अनुसार पूजा ‘संपन्न’ होते. कारण हे दैवत फक्त वरदान देणारं आहे. म्हणूनच तथास्तुच्या भावमुद्रा त्याच्या एका हातातून असते. दुसऱ्या हातात मोदक असतो. तो जीवनातला गोडवा निर्माण करण्याचा आणि टिकवून ठेवण्याची हमी देतो. (आता माणूसच ही नतमस्तक संकल्पना विसरतो आणि मधुमेहाच्या स्वाधीन होतो, त्याला काय करणार?) योग्यवेळी योग्य अन्नपदार्थ ‘उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म’ याची जाणीव सातत्याने जागृत ठेवते. स्निग्ध आणि प्रेमळ डोळे आपल्या अंत:करणातील जीवनातलं शाश्वत सत्य जे प्रेम आहे, ‘एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ’ याची ग्वाही देते. प्रेममय अंत:करण, हृदय म्हणजे मेंदूतील फिलगुड हार्मोन्सचा उद्गाता म्हणूनच ज्याचं मन प्रेमळ असतं, ते आजाराला कमी बळी पडतात आणि पडलेच तर लवकर बरे होतात, इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीचे प्रोटीन्स यामध्ये असतात. शरीराला योग्य आहार म्हणजेच मर्यादेत भोजन त्याचं प्रतीक म्हणजेच मोदक, सुख संवाद, आश्वासक वातावरण म्हणून हाताची वरदान आणि तथास्तुची भावमुद्रा याची पदोपदी वर्षभर जाणिवेची हमी देते आणि हातातला परशु मानवीय अहितकारी, गोष्टींचा नाश याचं प्रतीक म्हणजेच सर्व वाईट यापासून दूर राहा, नाही तर मी निसर्गाच्या माध्यमातून काहीतरी उलथापालथ घडवून आणेन अर्थात मी चांगल्याचा साथीदारच राहणार आहे. याचीही हमी हा परशु देतो.

जीवनातली निवांत, ध्यानस्थ आणि मोक्षत्व याची हमी म्हणजे गणेशाचं आसनस्थ असणं. मोठे उदर किंवा लंबोदर याचा अर्थ देगा हरी पलंगावरी असा नसून, प्रतिकात्मक ध्येयाकडे अंगुलीनिर्देश करते. म्हणजे ‘तू कष्ट कर, परिश्रम कर, मेहनत कर, त्याचं फळ निश्चित मिळेल.’ मात्र, कुणाला लुबाडू नका, प्रामाणिक राहा, योग्य खर्च करा, योग्य किंमत घ्या आणि निवांतपणा अनुभव, साक्षिभाव अनुभवा आणि आपलं जीवन संपन्न करा याचं हे प्रतीक आहे. शेजारी बसलेला मूषक म्हणजे उंदीर गणेशाचं वाहन अशी पुरातनकारांनी संकल्पना केली आहे. त्याचा अर्थच असा की, आपल्या ध्येयाचा, कामाचा, निष्ठेचा, संयमाचा, योग्य आर्थिक व्यवहाराचा, योग्य वर्तणुकीचा, नम्रतेचा, अहंकाररहित जीवनाचे फलीत तुला नक्की मिळणार आहे. मात्र, तू तुझा मार्ग सोडलास तर तुझं जीवन हळूहळू, कुरतडून जाईल. उंदीर ही संकल्पना फारच रुपकात्मक आहे. उंदीर सर्व गोष्टी हळूहळू कुरतडतो. आपलं स्वत:चं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य, समाजाचं आरोग्य, देशाचं आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यही कुरतडलं (पोखरल) जातं. मात्र, सर्व गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी वर्षांतून एकदा हे आद्यदैवत आपल्या घरी येतं. तसेच मूषक प्रेम श्री गणेशासाठी सर्वजण समान आहेत. सर्वांना हक्क आहेत याचंही हे एक प्रतीक आहे. (अर्थात अति उंदीर झाले तर उंदीर मारा चळवळ सुरु करावी लागते. त्याचेही काही वेगळे निकष आहेत.) याचे ते प्रतीक आहे.

गणेशोत्सव उंबरठ्यावर टकटक करायला लागला की, घरधन्यांची आणि कुटुंब रक्षणकर्ती आणि पालनकर्ती घरथनीन यांची घराची स्वच्छता, रंगरंगोटी, मखर, आरास यासाठी धावपळ सुरु होते. घर जागं होतं यात आरोग्यमयतेचे सूत्र दडलेले आहे. पावसाळा ऐन मध्यावर असतो किंवा संपण्याच्या काठाकडे वळत असतो. ‘स्वच्छता’ हा उत्तम आरोग्याचा ‘देयक’ आहे. इन्स्टंट कॅशचा बॉण्ड आहे. ‘स्वच्छता असली की आरोग्याची हमी’ हमखास मिळते. शुद्ध हवा असली की, हवेतून विषाणू आणि जंतूंचा संसर्ग होत नाही. प्रिव्हेंटिव्ह मेडिसीनचे हे पायाभूत निष्कर्ष आहेत. या सर्व गोष्टी स्वच्छ गोष्टी आरोग्य संपत्रतेची हमी देतात. तर गणेशोत्सव याची जाणीव करुन देतो. मनाला क्षणभर विश्रांती तसेच गणेशाच्या आरत्या, धुपारत्या, भजने यामुळे मनातील, जनातील आणि समाजातील भक्तीमंदिरे जागृत होतात. भक्तीमय भाव ही एक ‘भावातीत ध्यानावस्था’ असते. माणूस सर्व दुःखे पार विसरुन जातो. क्षणभर गणेश आराधनेत मान होतो. त्यावेळेस सर्व आजारी मनाची जळमटे बाजूला सारली जातात. नवचैतन्य, उमेद आणि ऊर्जा याची ज्योत मनात तेवते, हृदयातून पाझरते आणि बुद्धीला लक्ष केंद्रीत करण्याची ध्यानावस्था देते. श्री गणेशाचे डोळे यावर लक्ष केंद्रीत असते. एकाचवेळी मृदुंगाच्या तालावर, हार्मोनियमच्या सुरावर, टाळ्यांच्या आणि ‘टाळ’ यांच्या लयबद्धतेवर, मुखातून निघणाऱ्या एकत्रित सुरांवर, तन-मनाच्या एकाग्रतेमुळे माणसाची क्षमता वाढते. मनोकायिक आजार दूर पळतात. या बुद्धीच्या देवतेचं विज्ञाननिष्ठतेने स्मरण केले, तर वर्षभर ही भायावस्था, अनुभवावस्था, आरोग्यावस्था आणि त्यातून मिळणारी सर्वाच्या आनंदाची आनंदावस्था वर्षभर टिकून राहते. ‘पुढल्या वर्षी लवकर या’ म्हणून सर्व गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करतात. मात्र, या काळात ‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’ म्हणजे आपण सर्व त्याच्या आशिर्वादाने विजयी होऊच याची ग्वाही देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here