माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (66) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शनिवारी दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिशू सरकोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
जेटली यांना 9 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
