दांडेआडोम येथे उभा राहणार अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहर विस्ताराचा भविष्यातील 30 वर्षांचा विचार करून दांडेआडोम येथे सुमारे 15 कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे अडीच हेक्‍टर जागेवर प्रकल्प असून कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प, वीज प्रकल्प, मैलाप्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे. याचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा 1 कोटी 65 लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. पालिका सभागृहापुढे तो लवकरच ठेवण्यात येणार आहे. पालिकेची पडती बाजू राहते ती स्वतःच्या घनकचरा प्रकल्पाची. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापूर्वीपासून पालिका घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील होती. शहराजवळच्या अनेक जागा निश्‍चित केल्या; मात्र त्याला विरोध झाला. अखेर दांडेआडोम येथील जागा निश्‍चित केली. पालिकेने तेथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला; मात्र दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. ते पालिकेविरोधात न्यायालयात गेले. अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला. शहरात सुमारे 22 टन कचरा दरदिवशी गोळा होतो. या कचऱ्यावर या घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. कचरा डंप करून (गोळा करून) ठेवला न जाता त्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here